मुंबई: मकरसंक्रांतीच्या सुमुहूर्तावर दिनांक १५ जानेवारी २०२३ ला मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवांतर्गत सुरेंद्र गावस्कर सभागृहात मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय आणि गझल मंथन साहित्य संस्थेच्या संयुक्त विद्यमाने मुंबई जिल्ह्यामार्फत मराठी गझल लेखन कार्यशाळा आणि मराठी गझल मुशायरा यांचे आयोजन करण्यात आले होते.
सुप्रसिद्ध गझलकार डॉ. कैलास गायकवाड, श्याम खामकर आणि प्रमोद खराडे हे मान्यवर गझल कार्यशाळेचे प्रशिक्षक होते. या कार्यशाळेसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून तसेच सिल्वासाहून देखील सुमारे ८० पेक्षा जास्त प्रशिक्षणार्थी उपस्थित राहिले होते. गझलमंथनच्या मुंबईत झालेल्या या पहिल्याच ऑफलाइन विनामूल्य गझल लेखन कार्यशाळेला प्रशिक्षणार्थींनी भरघोस प्रतिसाद दिला. सकाळच्या पहिल्या सत्रातील काही तासांच्या प्रशिक्षणानंतर उपस्थित प्रशिक्षणार्थींनी एक मतला आणि २ शेर लिहिण्यापर्यंत मजल मारली. त्यातील पाच निवडक प्रशिक्षणार्थींचा गझलमंथन साहित्य संस्थेमार्फत सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
दुपारच्या सत्रात प्रमोद खराडे(पुणे) यांच्या अध्यक्षतेखाली डॉ.कैलास गायकवाड(नवी मुंबई), शांताराम खामकर (शाम) (अहमदनगर), प्रदीप तळेकर(पुणे), पूर्णिमा पवार(रत्नागिरी), बा.ह.मगदुम(पुणे), मानसी जोशी(ठाणे), सुनेत्रा जोशी(रत्नागिरी), ॲड.मुकुंदराव जाधव (जळगाव), यशश्री रहाळकर(नाशिक), डॉ. सुभाष कटकदौंड(रायगड), डॉ. मंदार खरे(पुणे) आणि एस.जी. गुळवे(पालघर) हे महाराष्ट्रातील विविध भागातील सुमारे १५ नामांकित गझलकार मुशायऱ्यासाठी उपस्थित राहिले आणि त्यांनी आपल्या एकापेक्षा एक अशा अप्रतिम गझला सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
नंदुरबारच्या विष्णु जोंधळे यांनी गझल मुशायऱ्याचे सूत्रसंचालन उत्कृष्ट केले. संध्याकाळी उशिरापर्यंत चाललेल्या या गझल मुशायऱ्याला श्रोत्यांनी भरभरून दाद दिली आणि वर्षाच्या सुरुवातीलाच असा देखणा आणि सुंदर कार्यक्रम दिल्याबद्दल मुंबई जिल्हा कार्यकारिणीचे उपस्थितांनी तोंडभरून कौतुक केले.
यावेळी गझल मंथन साहित्य संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनिल कांबळे, पनवेल शाखेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र सोनावणे, ठाण्याच्या मानसी जोशी, पुण्याचे बा. ह. मगदूम तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांचे बहुतांशी कार्यकर्ते जातीने उपस्थित होते. कोरोना टाळेबंदी काळात विनामूल्य ऑनलाईन गझल लेखन कार्यशाळा घेणाऱ्या उर्मिला बांदिवडेकर आणि डॉ. शरयू शहा ही जोडगोळी तसेच गुरुदत्त वाकदेकर, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचे प्रमुख कार्यवाह रविंद्र गावडे, कार्याध्यक्षा शीतल करदेकर, पदाधिकारी सर्वश्री नांदविस्कर, जयवंत गोविलकर, अमेय कोंडविलकर, लता गुठे आणि पत्रकारदेखील आवर्जून उपस्थित होते. पुढल्या महिन्यात नवीन ठिकाणी नव्या उत्साहाने भेटण्याचे निश्चित करून सदर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.