विद्यानिधीत ‘जागतिक महिला दिन’ साजरा!

मुंबई: उपनगर शिक्षण मंडळ संचलित विद्यानिधी व्रजलाल पारेख माध्यमिक शाळेत महिला दिवसाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. मुख्य अतिथी म्हणून राष्ट्रीय ॲथलेटिक्स चॅम्पियन जुहू पोलिस ठाणे येथील पोलीस उपनिरीक्षक (PSI) योगिता पवार उपस्थित राहिल्या. शाळेच्या ५ वीच्या वर्गाने हा कार्यक्रम आयोजित केला होता. राज्यगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर विविध कविता, गाणी, नृत्य, पुस्तक परिक्षण, भारतातील प्रसिद्ध महिलांवर आधारित प्रश्नमंजुषा आयोजित केल्या होत्या.यावेळी इयत्ता ९वी च्या विद्यार्थ्यांनी स्त्री पुरुष समानतेवर आधारित इंग्रजी नाटुकले आणि स्वरचित कविता सादर केल्या.

मुख्य अतिथी योगिता पवार यांनी विद्यार्थ्यांना मोबाईल टाकून मैदानात उतरण्याचा संदेश दिला. तसेच शिक्षणाच्या माध्यमातून मुलींनी स्वतःला सक्षम बनवण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचा समारोप महिला पालकांसाठी आयोजित केलेल्या खेळाने झाला. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा बालपण अनुभवता आले. विजेत्यांना मुख्य अतिथीच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.