अंधेरीच्या विद्या विकास मंडळ विद्यालयात पर्यावरणाचा संदेश देणाऱ्या श्रीगणेशांचे उत्साहात विसर्जन!

मुंबई:गणपतीच्या सुट्टीवर जाण्यापूर्वी शाळेतील विद्यार्थ्यांनी माजी विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनात तिसऱ्या वर्षी पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्या गणेशमूर्ती शाळेतील आर्ट्स व क्राफ्ट सेंटरमध्ये बनवल्या. विविध कल्पनांनी साकारलेल्या या १८ मूर्तींना मुलांनी सुंदररित्या रंगवले.सर्व मूर्तिकार विद्यार्थ्यांना स्व.रेखा मंत्री स्मृती पारितोषिके देण्यात आली. सर्वोत्तम पहिल्या सहा मूर्ति बनविणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष पारितोषिकं देण्यात आली.

शाळा सुरु झाल्यानंतर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन या गणेश मूर्तींची आरती केली. विद्यार्थी मंत्रीमंडळाच्या सदस्यांना व वर्ग प्रतिनिधींना आरती ओवाळण्याचा मान मिळाला. यात ६०% मुली होत्या हे विशेष.शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक , माजी विद्यार्थी आणि विद्यार्थी या आरतीत मोठ्या संख्येने सहभागी झाले.विद्यार्थ्यांनी अथर्वशीर्षाचे पठण केले आणि उपस्थितांना प्रसाद वाटण्यात आला. “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!” या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला मुलांच्या वाद्यवृंदाच्या व लेझिमच्या घोषात शाळेच्या प्रांगणात गणेश मिरवणूक काढून मुलांनीच तयार केलेल्या कृत्रिम विहिरीत सर्व गणेशमूर्तींचे विसर्जन केले गेले.गणेश विसर्जनाचा मान विद्यार्थिनींना देऊन विद्यार्थ्यांनी स्त्री सन्मानाचा एक नविन पायंडा निर्माण केला.