विद्यानिधी संकुलात अवतरले शालेय गणवेशातील बाल गणेश
मुंबई: संस्कार शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या जुहू येथील विद्यानिधी संकुलात शाळेच्या स्थापनेपासून गेल्या ५६ वर्षात विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. भविष्यात विद्यार्थ्यांना भक्कमपणे उभे राहण्याकरिता सुसंस्कारांचे बीजारोपण केले जाते. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्यामध्ये जीवनमूल्ये, सामाजिक जाणीव आणि राष्ट्रभक्तीचे संस्कार तसेच सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासावर विशेष भर दिला जातो. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांना शिक्षण देत ‘सामान्यांना असामान्य घडवणे’ हे विद्यानिधीचे दृष्टी विधान असून, यंदाचा विद्यानिधी गणपती स्वतः शाळेच्या गणवेशात अवतरला आहे.
शाळेच्या गणवेशातील हा गणपती केवळ मूर्ती नसून पंच परिवर्तनाचा जिवंत संदेश आहे.
१.स्वदेशी: ग्राहक पेठ, खादी ग्रामोद्योग आणि BIS यांच्या सहकार्याने स्वदेशीचा आग्रह धरणारा गणेश.
२.कुटुंब प्रबोधन: मातृपूजन, सखी सावित्री आणि विद्यानिधी गणपतीतून कुटुंब संस्कार जपणारा गणेश.
३.नागरी कर्तव्य: रक्तदान आणि रात्रशाळेच्या माध्यमातून समाजसेवेचे कर्तव्य शिकवणारा गणेश.
४.पर्यावरण रक्षण: निर्माल्यातून शक्ती/खत बनवून प्लास्टिक पुनर्वापर पर्यावरण वाचवण्याचा संदेश देणारा गणेश.
५.सामाजिक समरसता: रक्षाबंधन आणि सैनिकांना पत्र लिहून सर्वांना जोडणारा गणेश.
या पाच संकल्पना मिळूनच पंचपरिवर्तन घडते आणि त्यातूनच समाजात पूर्ण परिवर्तन येऊ शकते, हीच विद्यानिधीची शिकवण यंदाचा गणेश देत आहे.
‘संस्कारित विद्यार्थी म्हणजे सक्षम समाजाची आणि सशक्त राष्ट्राची पायाभरणी’ या विचाराला केंद्रस्थानी ठेवून शाळेचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद ठरत आहे. विद्यार्थ्यांच्या मनात ‘मी समाजासाठी काय करू शकतो?’ हा विचार रुजविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या माध्यमातून घडत आहे.
या कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आपल्या संस्कृती व परंपरांविषयी प्रेम, एकोपा आणि सामाजिक बांधिलकीची भावना निर्माण झाली. शिक्षक, विद्यार्थी व शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे गणेशोत्सव आनंदमय वातावरणात संपन्न होतो आहे.
गणेशोत्सवानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन
गणेशोत्सवाचा आनंद विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आणि सर्जनशीलतेला व्यासपीठ देत अधिक द्विगुणित करण्यासाठी विद्यानिधी शैक्षणिक संस्थेअंतर्गत KG ते PG पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी विविध गणेशोत्सव स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. हस्ताक्षर, चित्रकला,अथर्वशीर्ष पाठांतर, संस्कृत सुभाषित,क्विलिंग, कोलाज, वारली कला, मोदक बनविणे, मखर सजावट अशा विविध कलात्मक स्पर्धांमधून विद्यार्थ्यांना आपल्या कल्पकतेला आणि सुप्त गुणांना वाव देण्याची संधी मिळत आहे.
या विविध स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन विद्यानिधी शैक्षणिक संस्थेतील मुख्याध्यापकांच्या सक्षम आणि मार्गदर्शक नेतृत्वाखाली करण्यात येत आहे. सतीश दुबे, मीरा पवार , संतोष टक्के, निधी पोतदार, मनोज परमार आणि पूनम साखरकर , नीलम प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली KG ते PG पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग सुनिश्चित केला जात आहे.
या स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, आत्मविश्वास, संघभावना, स्पर्धात्मक वृत्ती तसेच आपल्या संस्कृती व परंपरांविषयी अभिमान निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. गणेशोत्सव हा केवळ उत्सव न राहता तो आनंद, कला, संस्कार आणि सामाजिक जाणीव यांचा सुंदर संगम ठरत आहे. विद्यानिधी संकुलाचा हा गणेशोत्सव म्हणजे उत्सवातून संस्कार, संस्कारातून व्यक्तिमत्त्व आणि व्यक्तिमत्त्वातून सक्षम समाज घडविण्याचा प्रेरणादायी प्रवास आहे.