मुंबई : अभिनेता संतोष जुवेकरच्या रावडी किंवा सोज्वळ नायकाच्या भूमिकांना प्रेक्षकांनी नेहमीच पसंती दर्शवली आहे. आता तो प्रथमच एका ऐतिहासिक चित्रपटात वेगळ्या नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. आगामी ‘रावरंभा’ चित्रपटात ‘जालिंदर’ या भूमिकेत तो दिसणार आहे. संतोषने आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा अतिशय वेगळया धाटणीची ही भूमिका आहे. कपटी स्वभावाचा जनावरांचा दलाल असलेला जालिंदर हा शत्रूंशी संधान बांधून कसे डावपेच रचतो ? हे यात पहायला मिळणार आहे.
‘वेगवेगळ्या भूमिका करायला मिळणं हे प्रत्येक कलाकाराचं स्वप्नं असतं’. ‘रावरंभा’ च्या निमित्ताने वेगळ्या धाटणीची भूमिका मला करायला मिळाली. निगेटिव्ह शेडची ही भूमिका असून मला स्वतःला ही व्यक्तिरेखा करायला खूप मजा आली. वेगवेगळ्या ऐतिहासिक कलाकृतीतून अशा व्यक्तिरेखांची ओळख होत असते. माझ्या आजवरच्या भूमिकांना रसिकांनी जे प्रेम दिलं. तेच प्रेम ‘जालिंदर’ ला मिळेल असा मला विश्वास आहे,’ असे संतोष जुवेकरने सांगितले. निर्माते शशिकांत शीला भाऊसाहेब पवार आणि दिग्दर्शक अनुप जगदाळे ‘रावरंभा’ ही प्रेमकहाणी प्रेक्षकांसमोर आणली असून येत्या १२ मे ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.