‘अशीच आहे चित्ता जोशी’ नाटकासाठी प्रथमच वैशाली सामंतचं संगीत दिग्दर्शन!

मुंबई : आपल्या धडाडीच्या स्वभावातून अभिनेत्री मैथ्थिली जावकर सतत काहीतरी करत असते. अभिनय आणि निर्मितीनंतर आता ती लेखन दिग्दर्शनाकडे वळली आहे. ‘अशीच आहे चित्ता जोशी’ या नाटकाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी घेतली आहे. मनोरंजना सोबतच, आपली महान संस्कॄती आणि परंपरा यांची महती सांगणार हे नाटक आहे. या नाटकातून दिग्दर्शकीय पदार्पण करणाऱ्या मैथ्थिलीला साथ मिळाली ती गायिका वैशाली सामंत हिची. गाण्यातून आणि संगीतातून आपलं नाणं खणखणीत वाजवणाऱ्या वैशालीने प्रथमच एका नाटकासाठी गीत संगीताची जबाबदारी सांभाळली. या नाटकातील धाकड गीताला (थीम साँग) गायिका वैशाली हिने संगीत दिलंय, आणि स्वतः तॆ गाणं गायलंय. या नाटकाच्या निमित्ताने मैथ्थिलीच दिग्दर्शकीय पदार्पण आणि वैशालीच नाटकासाठी प्रथमच संगीत देणं हा योग ‘अशीच आहे चित्ता जोशी’ या नाटकाने जुळवून आणला आहे.

या गाण्या विषयी बोलताना वैशाली सांगते, ‘ हे गाणं करताना खूप धमाल आली. राजेश बामुगडे यांनी हे गीत खूप चांगल्यारीतीने शब्दबद्ध केलं आहे. आपल्या हक्कासाठी लढणार्याा स्त्री पात्रासाठी अतिशय चपखल असं हे गाणं करताना एका स्त्री दिग्दर्शिकेचा दृष्टीकोन मला अधिक भावला. त्यामुळे हे गाणं आणि मैथ्थिली सोबत काम करणं माझ्यासाठी ही खूप छान अनुभव होता.’

मैथ्थिली सांगते, ‘राज्यस्तरीय नाट्य लेखनाच्या एका स्पर्धेसाठी मी भाग घेतला होता. त्यात १७५ स्क्रिप्टमधून माझं हे नाटक तिसरं आलं. यातूनच मला हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आणण्याची प्रेरणा मिळाली. माझ्या एका चित्रपटाच्या निमित्ताने वैशालीची भेट झाली होती. तिची एनर्जी आणि कामाचं पॅशन नाटकाच्या गाण्यासाठी परफेक्ट वाटली. आणि खरंच तिने हे गाणं खूप मस्त सादर केलं आहे.’

ओम साईनाथ प्रॉडक्शन्स निर्मित, संस्कार भारती च्या सहयोगाने, स्मित हरी प्रकाशित वेगळ्या धाटणीच्या या नाटकाला चांगला प्रतिसाद मिळत असून मैथ्थिली जावकर सोबत रणजीत जोग, रुचिर गुरव, रचना कदम यांच्याही नाटकात भूमिका आहेत.