आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विद्यानिधी विद्यालयात योग कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उपनगर शिक्षण मंडळ संचालित विद्यानिधी व्ही.पी. मराठी माध्यम शाळेत १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन सकाळी संस्थेच्या किशनचंद वलेचा सभागृहात उत्साहात साजरा करण्यात आला. चैतन्य तीर्थ योगशाळेचे संस्थापक सुप्रसिद्ध योगगुरू चैतन्य तीर्थ हे कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते. त्यांच्या मार्गदर्शन व प्रात्यक्षिकात विद्यार्थी व शिक्षकांना हठयोग, प्रगत सूर्यनमस्कार, प्राणायाम व ध्यान यांचे सखोल प्रात्यक्षिक करून दाखवले. त्यांना शाळेचे मल्लखांब प्रशिक्षक अभिषेक मौर्य यांनी कुशलतेने सहाय्य केले आणि अवघड आसनांचे महत्व समजावून सांगितले.

हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी प्रेरणादायी ठरला.कार्यक्रमाला पालक वर्ग देखील उपस्थित होता व मुलांसोबत योगासने करून त्यांनी सहभाग नोंदवला. प्रसिद्ध समाजसेवक मधुकुमार राठी सर यांच्या प्रमुख उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली.

शाळेच्या पटांगणावर इयत्ता ५वी ते १०वीचे विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांनी योगाभ्यास केला.
मुख्याध्यापकांनी योगाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व विशद करून सर्वांचे आभार मानले. “योग करा, निरोगी राहा” या संदेशासह कार्यक्रमाचा समारोप शांती पाठाने झाला.