पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘मन की बात’ हा उपक्रम देशवासीयांना प्रेरणा देणारा असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे प्रतिपादन !

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेला ‘मन की बात’ हा आकाशवाणीवरील उपक्रम जगभरातील अनोखा आदर्श उपक्रम आहे. जगभर ‘मन की बात’चा प्रभाव आहे. कोटयावधी भारतीय दरवेळी मन की बात ऐकतात. मन की बात हा उपक्रम देशवासीयांना प्रेरणा देणारा आहे असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘मन की बात’चा आज १०० वा भाग आकाशवाणीवर प्रसारीत करण्यात आला, त्याचे श्रवण हरियाणा येथील कर्नालमधील शासकीय गेस्ट हाऊसवर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. आज संपूर्ण देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मन की बात चा शतक महोत्सव साजरा केला. कोटयावधी भारतीयांनी ‘मन की बात’चे श्रवण केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ ऑक्टोबर २०१४ ला ‘मन की बात’चा प्रारंभ केला. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रधानमंत्री मन की बात आकाशवाणीवरुन प्रसारित करतात. त्याचा आज १०० वा भाग देशाने शतक महोत्सव म्हणुन साजरा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मधून स्वच्छ भारत अभियान, बेटी बचाव बेटी पढाव अभियान , मेक इन इंडिया अभियान अशा अनेक अभियानांचा प्रचार केला. निसर्गावर प्रेम करा, पर्यावरण वाचवा, स्त्री शिक्षण, ज्येष्ठ नागरिकांची काळजी घ्या अशा अनेक विषयांवर त्यांनी देशाला मार्गदर्शन केले. देशाच्या विकासासाठी ‘मन की बात’मधून त्यांनी देशवासीयांना मार्गदर्शन केले. देशातील अशा अनेक शूरवीर कला निपुण असणाऱ्या विविध प्रांतातील प्रसिध्दीपासून दुर असणाऱ्या लोकांना ‘मन की बात’मधून त्यांचा उल्लेख करुन त्यांना प्रकाशझोतात आणले, त्याचा अनेकांना फायदा झाला. ‘मन की बात’ने अनेक इतिहास घडविले आणि जगातला हा अनोखा उपक्रम संपूर्ण जगाने आज गौरविला आहे. युनोच्या कार्यालयातही आज ‘मन की बात’चे श्रवण करण्यात आले. अनेक नवीन उपक्रम आणणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातले प्रथम क्रमांकाचे नेते ठरले आहेत. त्यांनी सुरु केलेला ‘मन की बात’ हा उपक्रम जगानेसुध्दा गौरविला आहे. पंतप्रधान मोदींच्या मन की बात या उपक्रमाची इतिहासात सुवर्ण अक्षराने नोंद केली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात उपक्रमाची भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने नोंद केली जाईल, असे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले.