मुंबई: जुहू येथील विद्यानिधी व्रजलाल पारेख शाळा मराठी माध्यमाने अटल मॅरेथॉन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. अटल इनोव्हेशन मिशन या नीती आयोग, एससीईआरटी व विद्या प्राधिकरण संस्थेतर्फे आयोजित मानाच्या समजल्या जाणाऱ्या अटल मॅरेथॉन स्पर्धेमध्ये विद्यानिधी व्रजलाल पारेख हायस्कुल मराठी माध्यम जुहू येथील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
अटल मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन सायनच्या डीएस शाळेत करण्यात आले होते. या स्पर्धेत इयत्ता ८ वीतील सिद्धेश महेश भोसले व वीर मंगेश नरवणकर या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली,यासाठी त्यांना विज्ञान शिक्षिका अनुजा थोरात यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशामुळे सामान्यांना असामान्य बनविणारी शाळा हा ‘विद्यानिधी पॅटर्न’ दिवसेंदिवस यशस्वी होत असल्याचे सिद्ध होत आहे. विद्यार्थी व शिक्षकांच्या या यशाबद्दल परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.